Home राजकीय सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही : संजय राऊत

सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही : संजय राऊत


मुंबई-वृत्तसेवा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटासोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता ठामपणे फेटाळून लावली आहे. “आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाहीत. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असताना राऊत यांनी मात्र युतीचा कोणताही मार्ग बंद असल्याचे स्पष्ट केले. “पक्ष या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईल, पण भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौरपद सोडणार नाही,” असेही ते म्हणाले.

राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिली, त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. पण त्याच वेळी त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि शिवसेनाप्रमुख पदावर एकनाथ शिंदे यांना बसवले. आता मोदी शिंदेंकडून ऊर्जा आणि मार्गदर्शन घेत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य ठरलेले व्यक्तिमत्त्व होते. “त्यांनी महाराष्ट्राला एकजुटीचा विचार दिला. मराठी माणूस असो किंवा हिंदू समाज, ऐक्याची वज्रमुठ कोणत्याही संकटावर मात करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले. सामान्यातील माणसाला शूरवीर बनवण्याचे काम बाळासाहेबांनी केले,” असे ते म्हणाले.

आज सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

“भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटली आहे. त्यांनी पैशांचा वापर करून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. हा काही बाळासाहेबांचा विचार नव्हता,” असा आरोप करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या वक्तव्याचाही उल्लेख करत भाजपच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.

एकूणच, शिंदे गटासोबत कोणत्याही राजकीय समीकरणाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आपली भूमिका अधिक कठोर केल्याचे या वक्तव्यातून दिसून येते.


Protected Content

Play sound