मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेव | काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती नैसर्गिक नसल्याची टीका करणाऱ्या भाजपची गोची करणारे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी महायुतीबद्दल टिप्पणी केली आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेली आमची युती नैसर्गिक नाही. अजितदादांना आमचा गुण लागण्यासाठी वेळ लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले आहे. अजित पवार यांनी अलीकडच्या आपल्या राजकीय भूमिकेविषयी वक्तव्य केलं होतं. महायुतीत असलो तरी धर्मनिरपेक्षतेशी तडजोड करणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या दारुण पराभवानंतर अजित पवार यांच्याशी झालेल्या युतीकडं बोट दाखवलं गेले होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही आपल्या मुखपत्रातून नाराजी व्यक्त केली होती. ती चूक होती का असं फडणवीसांना विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. ती त्या वेळेची गरज होती. आलेली संधी कधी सोडायची नसते. सगळे काही स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागेल. त्यांना आमचा गुण लागेल. त्यामुळं दोघांचाही फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांचे विश्लेषणही त्यांनी केलं. ‘महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ तीन टक्क्यांचा फरक आहे. त्यातून विजयी जागांचा आकडा बदलला. भाजपची मतं जितक्या सहजपणे शिवसेनेला मिळाली आणि शिवसेनेची मतं जितक्या नॅचरली आमच्याकडं आली, तसं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मतांचं झालं नाही. आमचीही मतं त्यांना पूर्ण मिळाली असं म्हणता येणार नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. येत्या विधानसभा निवडणुकीत मतं एकमेकांकडं ट्रान्सफर होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिवसेनेशी आमची युती नैसर्गिक आहे. वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम करतोय. मागील काही वर्षांत राजकीय परिस्थिती बदलल्यामुळं अजितदादा सोबत आले. ही युती राजकीय आहे. आणखी पाच-दहा वर्षांनंतर ही युती नॅचरलहोईल. आज तसं आहे असं म्हणता येणार नाही. असं असलं तरी ही युती तकलादू नाही. ती अनेक वर्षे चालेल, असं फडणवीस म्हणाले.