Home Cities मुक्ताईनगर अन्यथा धनगर समाज मतदानावर बहिष्कार टाकणार; मुक्ताईनगरमध्ये बैठकीत ठराव 

अन्यथा धनगर समाज मतदानावर बहिष्कार टाकणार; मुक्ताईनगरमध्ये बैठकीत ठराव 

0
1553

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील धनगर समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की, राजकीय पक्षांनी मूळ ओबीसी समाजातील उमेदवारांना तिकीट दिले नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये धनगर समाज मतदान करणार नाही. हा ठराव नुकत्याच पार पडलेल्या धनगर समाजाच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.

जय मल्हार सेनेचे प्रमुख समाजभूषण मा. लहुजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर महाराष्ट्र प्रमुख रवी भाऊ पवार, माजी नगरसेवक राजू हिवराळे, दिगंबर कारंडे, माधव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. तालुक्यातील विविध भागांतील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मत व्यक्त केले.

या बैठकीत मराठा समाजाला लागू करण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे, धनगर समाजालाही अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलती तात्काळ लागू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. या मागणीसंदर्भात शासनाकडे दबाव वाढवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावर हालचाली करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यात मेंढपाळांवर झालेल्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मेंढपाळांच्या वाड्यांवर दरोडे टाकून मेंढ्या चोरणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई करून, त्यांच्या मालमत्ता परत मिळवून द्याव्यात, अशी जोरदार मागणी बैठकीतून झाली. मेंढपाळ कुटुंबांचे जीवन असुरक्षित बनले असून, अशा पार्श्वभूमीवर त्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देण्यात यावा, अशीही सूचना करण्यात आली.

या सर्व मागण्यांसाठी येत्या १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर जय मल्हार सेनेच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

बैठकीस गजानन कवडे, रवींद्र पाचपोळ, बाळू शिंदे, बाळाभाऊ चिंचोले, सुभाष कचरे, जितेंद्र जुमडे, विजय सावळे, नरेंद्र पवार, सचिन धनगर, तानाजी धनगर, भारत मदने, सिताराम बिचकुले, शिवा झिटे, शंकर केसकर, हिरामण येळे यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound