जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील वसतीगृह प्रवेश प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. शासन मान्यताप्राप्त वसतीगृहांमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विविध सुविधा व आरक्षणासह प्रवेश मिळणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जळगाव एम.आय.डी.सी. येथील मुलांसाठीचे वसतीगृह व मेहरुण रोड येथील मुलींसाठीचे वसतीगृह अशा दोन ठिकाणी अनुक्रमे ९ व ११ जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी केवळ शासनमान्य तांत्रिक, औद्योगिक, उच्च व व्यावसायिक शिक्षणक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पात्रता दिली जाईल. निवास, भोजन, अभ्यासिका, वाचनालय, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांसह संपूर्ण सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

प्रवेश अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी २९ ऑगस्ट २०२५ पासून महाराष्ट्र शासनाच्या https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व आधार कार्ड आदी कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करणे बंधनकारक आहे.
वसतीगृह प्रवेशासाठी आरक्षणही ठरवण्यात आले असून इतर मागास प्रवर्गासाठी ५१ टक्के, विजाभजसाठी ३३ टक्के, विमाप्रसाठी ६ टक्के, दिव्यांगांसाठी ४ टक्के, अनाथांसाठी २ टक्के आणि EWS गटासाठी ४ टक्के इतके प्रमाण ठेवण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोरील, महाबळ, जळगाव येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक वाय. पी. पाटील यांनी केले आहे. ही संधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी साधून आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक उन्नतीसाठी उपयोगात आणावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.



