चाळीसगाव, प्रतिनिधी | शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून लवकरच शासकीय योजनेची जत्रा आणि कृषी व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून उर्वरित व नव्याने सुरू झालेल्या शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून त्याचा १५ जुलै पासून शुभारंभ करण्यात येईल अशी माहिती खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिली आहे.
आज (दि.६) दुपारी १.०० वाजता येथील तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी तहसीलदार विशाल सोनवणे, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, सदस्य सुनील पाटील, कपिल पाटील पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका कृषी अधिकारी सी.डी. साठे, पाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, सहाय्यक निबंधक पी. बी. बागुल, एस. टी. डेपो व्यवस्थापक संदीप निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी तहसीलदार विशाल सोनवणे यांनी केले तहसीलदार अतुल मोरे यांनी आभार मानले. प्रांताधिकारी शरद पवार यांनी शासकीय योजनेची जत्रा, कृषी महोत्सव व सांस्कृतिक महोत्सव याचा प्रचार प्रक्रिया व लाभ यासाठी आजपासूनच विविध विभागांनी नियोजन करावे या कामातून जनतेला अधिक लाभ मिळाला तर शासनाच्या विविध विभागांवरील ताण कमी होऊन प्रशासनाची उंची वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात आपण सर्वांनी कामाला लागावे. गरज भासल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
१५ तारखेला अभियानाचा शुभारंभ :- खा. पाटील यांनी यावेळी सांगितले की, गेल्या ‘शासकीय योजनेची जत्रा’ या कार्यक्रमाची दखल माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली होती. असे उपक्रम राज्यभरात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. यावेळी सहभागी सर्वच अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक यांना कर्तव्याबरोबर जनतेची सेवा केल्याची समाधान लाभले होते. शासनाच्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून येत्या जत्रेसाठी सहकार्य करावे. तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेतून तसेच कृषी महोत्सवातून नवीन ज्ञान तंत्रज्ञान याची ओळख शेतकरी राजास मिळणारा आहे. येत्या १५ तारखेला या अभियानाचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी मांडला लेखाजोखा :- याप्रसंगी वरखेड लोंढे प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू असून आधुनिक मशीनरीद्वारे हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती अभियंता सचिन पाटील यांनी दिली. पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पालिकेच्यावतीने रेन हार्वेस्टिंगसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. एस टी डेपो व्यवस्थापक संदीप निकम यांनी सुमारे २० हजार पेक्षा अधिक प्रवाश्यांना स्मार्ट कार्ड वाटप केले जाणार आहे, त्याची नोंदणी सुरू आहे, अशी माहिती दिली. यावेळी वीज वितरण, वन विभाग यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांचा आढावा सादर केला.