रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोनाच्या निर्बंधांमुळे डिसेंबर महिन्यात होऊ न शकलेली ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रावेर येथे घेण्यात येणार असल्याची माहिती व्याख्यानमाला आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्याख्यानमाला पूर्ण होऊ शकली नव्हती. व्याख्यान मालेत खंड पडू नये म्हणून सन २०२० तालुक्यातील ३ माध्यमिक शाळांमध्ये व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पण नंतरची २ व्याख्याने कोरोनाच्या निर्बंधांमुळे होऊ शकली नव्हती आणि डिसेंबर २०२१ मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करणे शाळेमधून देखील शक्य झाले नव्हते.
या पार्श्वभूमीवर आणि श्रोत्यांच्या मागणीप्रमाणे ‘इयत्ता १० आणि १२ वी’च्या परीक्षा संपल्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध वक्त्यांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच त्यांची नावे जाहीर करण्यात येतील आणि व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात येईल अशी माहिती व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य आणि डॉ राजेंद्र आठवले यांनी दिली आहे.