प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व हप्ता वितरण सोहळ्याचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर ८९ हजार ८६८ उद्दिष्टांपैकी ८४ हजार ४५४ लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन भवन येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यस्तरीय कार्यक्रम:
राज्यस्तरावर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

थेट प्रक्षेपण:
जळगाव जिल्ह्यातील ८४,४५४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्रप्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा हे राज्यभरातील लाभार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील पहूर पेठ, देवगाव, साकरी, पाळधी, हातेड, दहिवद या ग्रामपंचायतींच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

सहभागी होण्याचे आवाहन:
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तसेच लाभार्थ्यांनी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी केले आहे.

<p>Protected Content</p>