फैजपूर प्रतिनिधी । श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, संत, महंत, आचार्य, महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. तथापि, श्रीराम मंदिर निर्माण अंतर्गत निष्कलंक धाम वडोदा येथे भव्य संत संमेलनाचे आयोजन दि.१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.
आता प्रत्यक्ष मंदिर निर्माण कार्यामध्ये प्रत्येक गावातून, प्रत्येक परिवारातून धनसंचय करणे आणि त्याआधारे भव्य मंदिर निर्माण करणे असे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाने निश्चित केली आहे. त्यानुसार येत्या मकर संक्रांत पासून म्हणजेच १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत देशभरात निधी संकलन अभियान पूर्ण होणार आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्या देवगिरी प्रांतात दिनांक १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत निधी संकलन अभियान घेण्यात येणार आहे. या निधी संकलन अभियानात सर्व संत महंत यांनी हे धर्मकार्य समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी व समाज जागृत आणि प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात व्यापक भव्य संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संत संमेलनात समिती अध्यक्ष परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज तसेच मुक्ताई संस्थानचे ह.भ.प.रविंद्रजी हरणे महाराज यांचे आशिर्वचन होणार असून यावेळी प्रांत सहमंत्री विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत श्री ललितजी चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी लाहोटी, जिल्हा अभियान प्रमुख व जिल्हा मंत्री योगेश जी भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वढोदा प्र. सावदा येथे दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११-०० ते ३-०० यादरम्यान घेण्यात येणार आहे. यासाठी देवगिरी प्रांत भुसावळ जिह्यातील रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, जामनेर, शेंदुर्णी या भागातील सर्व संत महंत यांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले आहे.