जामनेर (प्रतिनिधी) तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या संकल्पनेतून टाकरखेडा जि.प.शाळा येथे दिनांक ४ मे ७ मे पर्यंत उन्हाळी बाल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी जि.प. शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तर मार्गदर्शन करण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे उपस्थित होते.
तालुक्यात बाल उन्हाळी शिबीर म्हणजे ग्रामीण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे. जि.प शाळेत शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी पटनोंदणी सुरू असून विविध उपक्रम राबविले जात आहेत. जामनेर तालुका जिल्ह्यासाठी मॉडेल ठरेल, असे उपक्रम राबविले जात आहेत. हे उन्हाळी शिबीर हा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असून यातून विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असल्याचे शिक्षण अधिकारी बी. जे.पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच चांगले दप्तर चांगले ड्रेस चांगले बूट शूज म्हणजे चांगले शिक्षण असे नाही, खाजगी शाळा आधी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रवेश देतात, त्यामुळे त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी असते. मात्र जि.प.शाळेत त्यापेक्षा परिस्थिती वेगळी असून सर्वच विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा न घेता त्यांना प्रवेश दिला जात असतो, मग तो विद्यार्थी हुशार असो का सामान्य. अशाही परिस्थितीत जि.प. शाळा शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात, असे नवल पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रतापराव इंगळे यांनीही ग्रामीण भागातील जि.प. शाळेत शिकणारा विद्यार्थी देखील उच्चपदस्थ अधिकारी होऊ शकतो, असे म्हटले. पंचायत समिती सभापती नीता पाटील यांनी विध्यार्थी व शिक्षकांचे या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख, सरपंच व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.