
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक बौद्धांचे अस्मिता स्थान असलेल्या बिहारमधील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी सुरू असलेली आंदोलने संघटनबद्ध झाली नाहीत तर यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन मुंबई विभागाचे मुख्य समन्वयक राजेश पवार यांनी केले. त्यांनी आंदोलन भावनिक न ठेवता संघटनात्मक पद्धतीने पुढे नेल्यासच विजय मिळू शकतो, असेही स्पष्ट केले.

डोलारखेडा येथे भव्य अधिवेशनाची रंगत
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्याचे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांचे संयुक्त अधिवेशन मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे पार पडले. या अधिवेशनाला उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य समन्वयक रवींद्र हिरोळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मराठवाडा मुख्य समन्वयक सत्यजीत साळवे, संविधान प्रचारक सुभाष कांबळे, प्रदेश संघटक दिलीप इंगळे, ज्येष्ठ पत्रकार मोहन मेढे, निवृत्त मेजर विनोद लहासे, मीडिया प्रभारी रतन डोंगरदिवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
इतिहासाचा धागा आणि संघर्षाचे स्मरण
सत्यजीत साळवे यांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास उपस्थितांना सांगितला. तर मोहन मेढे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील आंबेडकरी व धम्म चळवळीचा आढावा घेतला. या चळवळींनी सामाजिक परिवर्तन घडवले असून त्याच धाग्याला पुढे नेत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला गती मिळेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
महाराष्ट्राची जबाबदारी अधोरेखित
कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र हिरोळे यांनी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाचा दाखला देत शूरवीरांच्या वंशजांवर आता महाबोधी महाविहार मुक्त करण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. संघर्षमय परंपरा असलेल्या महाराष्ट्राने या लढ्यासाठी एकसंघ होऊन काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
युवक व महिलांची सक्रिय सहभागिता
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ थाटे, शिवाजी वानखेडे, दुर्योधन सुरवाडे, सुरेश इंगळे, बाळू इंगळे, भरत वानखेडे आदींसह धम्म उपासिका महिला मंडळानेही परिश्रम घेतले. महिलांची सक्रियता आंदोलनाला वेगळी ऊर्जा देणारी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. राहुल लहासे यांनी केले. पंकज रोटे यांनी आभार मानून सर्वांना आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.



