भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक 63 चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचा निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दिनांक 31 मे 2024 ते 3 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या या संकेतस्थळावर जाऊन त्यामध्ये CDS-36 अभ्यासक्रमासाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी [email protected] व दूरध्वनी क्रमांक 0253-245132 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

Protected Content