जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील करंज येथील प्रगतिशील शेतकरी अनिलजी सपकाळे यांना नाशिक येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषीमंत्री दादा भूसे यांच्या उपस्थितीत सेंद्रीय कृषी भूषण राज्यस्तरीय पूरस्काराने गौरवण्यात आले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा वतीने नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित सोहळ्यात २०१७ ते २०१९ या तीन वर्षातील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील ३ शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
यात करंज गावचे शेतकरी अनिल जीवनराम सपकाळे यांनी सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचा वारसा जपला आहे. यासह सेंद्रीय पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचा गट त्यांनी तयार केला असून त्या माध्यमातून मागील वर्षी केळीची निर्यात थेट इराणला केली होती.
जामनेर येथील शेतकरी रविंद्र माधवराव महाजन यांना कृषी श्रेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्यानपंडीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर एरंडोल तालुक्यातील उमरे येथील शेतकरी समाधान दयाराम पाटील यांना राज्यशासनाच्या वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. जिल्ह्यातील बळीराजाचे पूरस्कार देवून सम्मान करण्यात आल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.