Home Cities जामनेर जामनेरच्या जैन संस्थेच्या तिन्ही कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश; सखोल चौकशी होणार...

जामनेरच्या जैन संस्थेच्या तिन्ही कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश; सखोल चौकशी होणार !


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेमार्फत चालवण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी कॉलेजेसमध्ये सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे आदेश आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत नियम ९४ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले.

विधानसभा सदस्य विजय शिवतारे यांनी प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या कामकाजातील अनियमिततांवर प्रकाश टाकत चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार अमोल जावळे, मंगेश चव्हाण आणि अनुप अग्रवाल यांनीही सहभाग घेऊन गंभीर मुद्दे मांडले.

मंत्री मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितले की, “या संस्थेच्या कामकाजासंदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.” प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता, संस्थेच्या या तिन्ही कॉलेजेसमधील अनियमिततेबाबत आरोग्य विद्यापीठाकडून सात दिवसांत सखोल चौकशी करून सुनावणी घेतली जाईल. यासोबतच, शासन स्तरावरूनही आयुक्त व संचालक, वैद्यकीय शिक्षण यांच्यामार्फत स्वतंत्र चौकशी केली जाईल. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. या आदेशामुळे संस्थेच्या कारभारातील कथित गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound