जळगाव (प्रतिनिधी) शहरातील समतानगरातील धामणगाव वाडा भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा.समतानगर) याला न्यायालयाने आज मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी (दि.२७) रोजी आदेशबाबा याच्या शिक्षेवर सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आज शिक्षा सुनावली.
या संदर्भात अधिक असे की, समता नगरातील धामणवाडा परिसरातील नऊ वषीय बालिकेचे आदेश बाबा याने १२ जून २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता अपहरण केले होते. त्यानंतर तीच्यावर अत्याचार करुन रात्री गळा आवळुन खून केला आणि रात्रीच्या अंधारात बालिकेचा मृतदेह पोत्यात टाकुन घराशेजारीच असलेल्या एका टेकडीवर नेऊन फेकून दिला होता. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन मध्यरात्री (१३ जून) रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या परिसरात राहणारा आदेशबाबा हा देखील बेपत्ता झाला होता. यामुळे आदेशबाबावर संशय बळावला होता. दुसरीकडे सायंकाळी आदेशबाबाच्या घराजवळून बेपत्ता बालिकेच्या केसांचे क्लचर मिळुन आले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता टेकडीवर टाकलेला मृतदेह नागरीकांना आढळून आला होता. त्यानंतर पिडीत बालिकेच्या कुटंुबियांच्या आरोपानुसार आदेशबाबाच्या विरुद्ध अपहरण, खुन, अत्याचाराची कलमे वाढवण्यात आली. पोलिसांनी १५ जून रोजी सकाळी ७ वाजता आदेशबाबा याला अटक केली होती.पोलिसांनी गुन्ह्याचा संपुर्ण तपास करुन ४ सप्टेबर २०१८ रोजी न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश गोविंद सानप यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात सरकारपक्षाने एकुण २७ साक्षीदार तपासले होते. यातील सर्वच साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. साक्ष, वैद्यकीय पुराव्यांच्या अधारावर न्यायालयाने सोमवारी आदेशबाबा याला सर्व कलमांखाली दोषी धरले होते. तर बुधवारी शिक्षेसंदर्भात सुनावणी झाली होती. त्यानुसार आज न्या.सानप यांनी आदेशबाबाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके, मुळ फिर्यादीतर्फे अॅड.एस.के.कौल तर बचावपक्षातर्फे विधी सेवाप्राधिकरणाच्या वतीने अॅड.गोपाल जळमकर व विजय दर्जी यांनी काम पाहिले.