बाळापूर (वृत्तसंस्था) ईव्हीएमला विरोध म्हणून अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील एका मतदाराने चक्क मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळून फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. श्रीकृष्ण घ्यारे असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ठिकठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. राज्यभरात 9 वाजेपर्यंत अवघे एक टक्काही मतदान झालेले नव्हते. आज सकाळी अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण नावाच्या मतदाराने ईव्हीएम फोडले. ईव्हीएमला विरोध असल्यानेच मशीनची तोडफोड केल्याचा दावा त्याने केला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत श्रीकृष्ण घ्यारे याला ताब्यात घेतले आहे.