मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या २८८ आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येताना दिसले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या कृतीची खिल्ली उडवत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले. ते शनिवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी महाविकास आघाडीत काम केले आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना ३१ जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पण विधानसभेला पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचे हा अधिकार आहे. पण विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल असे अजित पवार यांनी म्हटले.
विरोधकांनी पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, असे दाखवायचे आहे. आम्ही संख्येने कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे. या सगळ्याला अर्थ नाही. सुरुवातीला विरोधाक आत बसले होते. आठ-दहा लोकांची शपथ झाल्यावर ते सभागृहातून बाहेर जायला निघाले. त्यावेळी मी त्यांना विचारले, कुठे चाललात? त्यावर विरोधक म्हणाले, असेच बाहेर जात आहोत. मी बाहेर आल्यावर कळालं की विरोधकांनी आज शपथ घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
आयकर विभागाने १००० कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली, विरोधकांच्या आरोपावर अजित पवार हसून म्हणाले.
अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची १००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार हसले. त्यांनी म्हटले की, मी इतकी वर्षे त्यांच्यासोबत होतो. मी भ्रष्टाचारी आणि दोषी असतो तर मविआने माझ्यासोबत काम केले नसते. कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही. यासंदर्भात प्रोसेस सुरु होती. मला जिथे न्याय मिळेल असे वाटत होते, तिकडे मी गेलो आणि न्याय मागितला. विरोधकांसाठी मी त्यांच्यासोबत असला की चांगला असतो. राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे असे अजित पवार यांनी म्हटले.