राज्यसभेत धनगडांना हटवण्याच्या तयारीत विरोधक; ८७ सदस्यांनी केली स्वाक्षरी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | 10 ऑगस्ट रोजी राज्यसभेचे सभापती आणि विरोधी सदस्य यांच्यातील विसंवादाचे रुपांतर संघर्षात झाले. परिस्थिती एवढ्या टोकाला पोहोचली आहे की, विरोधी पक्षांनी सभापती जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. हा प्रस्ताव औपचारिकपणे आल्यास संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष उपराष्ट्रपतींना हटवण्यासाठी पुढाकार घेतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन आणि जगदीप धनखड यांच्यातील वादानंतर वातावरण बिघडले. उपराष्ट्रपतींना हटवण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेच्या 87 सदस्यांनी स्वाक्षरी केली. काँग्रेसच्या राज्यसभा सदस्याच्या म्हणण्यानुसार, ‘प्रस्तावावर 4-5 काँग्रेस सदस्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. इंडिया आघाडीचे राज्यसभेत 87 सदस्य आहेत. बाहेरील सदस्यांनीही सह्या केल्या असण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी सभागृह नेते जेपी नड्डा यांनाही अनौपचारिक माहिती देण्यात आली होती की विरोधी पक्ष धनखड यांना हटवण्याचा प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. वास्तविक, धनखड आणि विरोधकांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. अशा तणावाच्या वातावरणात गुरुवारी धनखड आसनावरून निघून गेले होते. इंडिया आघाडीच्या मते, नोटीसद्वारे ते सभापतींच्या ‘पक्षपाती’ वृत्तीवर प्रकाश टाकतील. हा प्रस्ताव कधी मांडला जाणार हे अद्याप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया वाढवण्यात येणार आहे. रीतसर सादर करण्यासाठी दोनच सह्या पुरेशा असल्या तरी विरोधकांना आपली पूर्ण ताकद दाखवायची आहे. दरम्यान, शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळेपूर्वी तहकूब करण्यात आले.

Protected Content