मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील राज्य पोलीस दलातील विविध पदावर कार्य करणाऱ्यांसाठी पीएसआय होण्याची सुवर्णसंधी लाभणार असून ३० जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेत २५० पदांसाठी भरती होणार आहे.
राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक व पोलिस शिपाई पदावर कार्यरत असलेल्यांना पीएसआय होता येणार असून दि.३० जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा – २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ जून २०२२ आहे. ही परीक्षा राज्यातील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या केंद्रावर होईल. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी अर्ज दाखल करतानाच एका ठिकाणाची निवड करावी परीक्षा शुल्क ऑफलाईन तसेच ऑनलाईन भरता येणार आहे.
सर्वसाधारण गटातील कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा ४० वर्ष आहे. मुख्य परीक्षा वस्तूनिष्ठ प्रश्नांवर आधारित३०० गुणांची आणि शारीरिक चाचणीसाठी १०० गुणांची असणार आहे. अधिक माहितीसाठी http://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.