मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कंत्राटी भरतीवरून सरकारवर नाहक टिका करणार्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत असल्याचे सांगतांना हे पाप महाविकास आघाडीचेच असल्याचा दावा केला. यावरून त्यांनी जोरदार टिका देखील केली. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना-उबाठा पक्षावर जोरदार टिका केली.
या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंत्राटी भरतीवरून महायुतीच्या सरकारवर नाहक टिका करत बदनामी केली आहे. आता फडणवीस यांनी या प्रकरणातील सत्य समोर आणले असल्याने या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आमची माफी मागावी. यासाठी आम्ही उद्या सकाळी दहा वाजेपर्यंतची मुदत देत आहोत. अन्यथा, आम्ही राज्यभरात आंदोलन करू असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. यामुळे आता या मुद्यावरून राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.