Home क्राईम ऑपरेशन महादेव ; श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खातमा

ऑपरेशन महादेव ; श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खातमा


श्रीनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि सुरक्षा दलांची मोहीम यशस्वी ठरली आहे. सोमवारी (२८ जुलै) श्रीनगरच्या लिडवास भागात ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन टीआरएफ दहशतवाद्यांचा खात्मा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला ‘मुसा’ देखील ठार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई दहशतवाद्यांच्या हालचालींच्या गुप्त माहितीवरून करण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.

लिडवास हे श्रीनगरच्या उपनगरातील घनदाट जंगलाने वेढलेले डोंगराळ क्षेत्र असून, याच मार्गाने त्रालपर्यंत पोहोचता येते. या भागात मागील काही महिन्यांत टीआरएफच्या दहशतवादी हालचाली वाढल्याचे लक्षात आल्याने सुरक्षा दलांनी येथे सघन शोधमोहीम सुरू केली होती. त्या अनुषंगाने सोमवारी पहाटेपासून संयुक्त कारवाई सुरू झाली आणि काही तासांतच तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत लष्कराची चिनार कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस व सीआरपीएफचे जवान सहभागी होते.

सुरक्षा दलांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाममधील अलीकडील हल्ल्याचा मास्टरमाइंड ‘मुसा’ असल्याची शक्यता आहे. मात्र, त्याची अधिकृत ओळख अद्याप सुरू असलेल्या तपासाअंती स्पष्ट होणार आहे. मुसा याच्यावर अनेक गंभीर हल्ल्यांचे सूत्रधार असल्याचे आरोप होते. या कारवाईनंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घालून तपास सुरू ठेवला आहे.

दरम्यान, दाचिगम जंगल भागातही सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू ठेवली आहे. याच भागात जानेवारी महिन्यात टीआरएफचा गुप्त अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर या भागात सतर्कता वाढवण्यात आली होती. सोमवारी अचानक गोळीबार झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि लष्कराने कारवाई तीव्र केली. अद्याप काही दहशतवादी जंगलात लपले असण्याची शक्यता असल्याने मोहिम अजूनही सुरू आहे.


Protected Content

Play sound