चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे तोरणा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन नुकतेच ( ३१ मार्च) करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सन एज कंपनीचे छगन राठोड, प्रा.नितीन बानगुडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली दुर्ग संवर्धन कार्य महाराष्ट्रभर सुरू आहे. आतापर्यंत ७०० हुन अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा १७०० दुर्ग दर्शन मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. सहयाद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी काम करत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्यांवर राज्य व पुरातत्व विभाग आणि केंद्र पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाने गडकिल्यावर लोकवर्गणीतून तोफगाडे आणि प्रवेशद्वार बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत तुंग, तिकोना, गोरखगड, कर्नाळा आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वात प्रथम जिंकलेल्या तोरणा किल्ल्यावर प्रवेशव्दार लावण्यात आले आहे. श्री. गोजमगुंडे व प्रा. बानगुडे पाटील यांनी यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. राज्यभरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या शेकडो शिलेदारांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. संस्थेचे सचिव गणेश खुंटवड पाटील यांनी आभार मानले.