यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारीतील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेचे पूर्वीचे समोरील प्रवेशव्दार बंद ठेवून मागील बाजूस नवीन प्रवेशव्दार सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना, अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सध्या वापरात असलेले मागील बाजूचे प्रवेशव्दार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी गैरसोयीचे ठरत असून, त्या परिसरात गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या जिवितास धोका पोहोचण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक योगेश विजय चौधरी यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या समोरील बाजूस असलेले जुने प्रवेशव्दार तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थिनींवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडणार नाहीत, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने पालक व विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सहकार्य करावे व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
नगरसेवक चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, जुने प्रवेशव्दार तातडीने सुरू न केल्यास लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. हा इशारा प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गट शिक्षणाधिकारी तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या या निवेदनाच्या वेळी चेतन अढळकर, रोशन येवले, अतुल चौधरी, मुकेश कोळी, व्यंकटेश बारी, नितीन बारी, रितेश बारी, उज्वल कानडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित करत तातडीच्या निर्णयाची गरज व्यक्त केली.
एकूणच साने गुरुजी विद्यालयाच्या प्रवेशव्दाराचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय नसून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी निगडित असल्याने, प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन जुने प्रवेशव्दार सुरू करावे, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे संकेत या निवेदनातून मिळत आहेत.



