Home प्रशासन मुक्ताईनगरमध्ये बनावट दारूची खुलेआम विक्री ; कारवाईची मागणी

मुक्ताईनगरमध्ये बनावट दारूची खुलेआम विक्री ; कारवाईची मागणी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात सुरू असलेल्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये बनावट दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल होत असताना अवैध दारू विक्री वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा आहे. काही धाबे, टपऱ्या आणि रस्त्यालगतच्या दुकानांतून बिनधास्तपणे बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः यात्रा उत्सवाच्या काळात मागणी वाढत असल्याने या अवैध व्यवसायाला अधिकच ऊत आला आहे. पोलिसांचे कथित दुर्लक्ष आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे या प्रकाराला चालना मिळाल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरालगतच्या पूर्णाड फाटा, संत मुक्ताई चौक परिसर तसेच नॅशनल हायवे आणि भुसावळ रोडवरील काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या भागात अवैध दारूची साठवण आणि विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी बाहेरून आणलेली बनावट दारू स्वस्त दरात विकली जात असल्याचेही बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी तातडीने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यात्रा उत्सवाच्या काळात कोणतीही अनिष्ट घटना घडू नये यासाठी विशेष पथके नेमून धाडसत्र राबवावे आणि अवैध दारू विक्रीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.


Protected Content

Play sound