जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, इच्छुकांची प्रचंड धावपळ पाहायला मिळत आहे. आज, सोमवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासूनच महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

समर्थकांचा जल्लोष आणि गर्दी
समर्थकांचा जल्लोष आणि गर्दी अनेक दिवसांपासून जागावाटपाचा पेच आणि पक्षांतर्गत चर्चेमुळे उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रमाण संथ होते. मात्र, आता मुदत संपण्यास अवघा ४८ तासांचा अवधी शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आज सकाळपासून गर्दी केली. उमेदवारांसोबतच त्यांचे शेकडो समर्थक पालिकेच्या आवारात जमा झाल्याने संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. प्रत्येक प्रभागातील इच्छूक उमेदवार आपले शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचत होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अर्जाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. जळगाव शहर पोलिसांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेड्स लावून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केवळ उमेदवार आणि मोजक्याच व्यक्तींना आत प्रवेश दिला जात असून, गर्दीला प्रवेशद्वाराबाहेरच थोपवण्यात आले आहे.
अंतिम मुदत जवळ आल्याने धाकधूक
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर अर्ज भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक उमेदवार ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करताना दिसले. उद्या, ३० डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित उमेदवार उद्या मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.



