यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. सभापती राकेश फेगडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने बाजार समितीच्या मुख्य बाजार यावल तसेच उपबाजार किनगाव येथे शेतमाल लिलावाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या नवीन प्रक्रियेमुळे आता लिलावात शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना माल विक्रीची सविस्तर पावती थेट व्हॉट्सॲपवर मिळणार असून, ती तत्काळ प्रिंट स्वरूपातही उपलब्ध होणार आहे. यासाठी बाजार समितीने ‘बंतोश’ ॲप प्रणालीशी करार केला असून, शेतकरी आता त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे विक्रीची सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकणार आहेत.
शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी आपल्या अँड्रॉईड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून ‘बंतोश’ हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. या प्रणालीमुळे लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणार असून, शेतकऱ्यांना अनधिकृत व्यापाऱ्यांपासून होणारी फसवणूक रोखली जाणार आहे. शेतकरी बांधवांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या डिजिटल टप्प्याकडे उचललेल्या पावलामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.