बोदवड महाविद्यालयात शिक्षकांसाठी ऑनलाइन व्याख्यान ट्रेनिंग वर्कशॉप

बोदवड प्रतिनिधी । बोदवड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या हस्ते शिक्षकांसाठी ऑनलाइन व्याख्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कोविड-19 च्या वातावरणात यूजीसी,महाराष्ट्र शासन व कबचौ उमावि,जळगाव यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आजपावेतो महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग सुरु होऊ शकले नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांनी ऑनलाइन व्याख्यानाद्वारे शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरु राहावी हा हेतु समोर ठेऊन माननीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील ऑनलाइन लेक्चर मॉनिटरिंग समितीद्वारे या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील सुनंदा नारायण चौधरी सभागृहात करण्यात आले.सदर कार्यशाळेच्या उद्घाटनपर मनोगतात माननीय प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी एकविसाव्या शतकात बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता संगणक व त्यासंदर्भातील तांत्रिक ज्ञान शिक्षकांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.माननीय प्राचार्यांनी संगणकाच्या विविध संज्ञा विषयी माहिती दिली व सदर माहितीचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होईल याकडे शिक्षकांचे लक्ष वेधले.

या कार्यशाळेत प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.चेतनकुमार शर्मा यांनी ओबीएस सॉफ्टवेयर द्वारे व्याख्यानाचा वीडियो तयार करणे व तो एडिट करण्याची प्रक्रिया शिक्षकांना सांगितली. रसायनशास्त्र विभागप्रमुख श्री. नरेंद्र जोशी यांनी शिक्षणासाठी “गूगल क्लासरूम” द्वारे व्याख्यान देणे, चाचणी परीक्षा घेणे,विविध समस्यांचे निदान करणे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवणे याविषयी मार्गदर्शन केले. संगणकशास्त्र विभाग प्रमुख विशाल जोशी यांनी झूम, गूगल मिट याविषयी शिक्षकांना सखोल माहिती दिली तसेच शिक्षकांनी घेतलेल्या व्याख्यानांचे रेकॉर्ड ठेवणे ईत्यादि विषयी माहिती दिली.

टेक्नोलाइट सॉफ्टवेयर सोलूशन्स लिमिटेडचे प्रमुख आनंद जैन यांनी महाविद्यालयाच्या वेबसाइटद्वारे व्याख्यान देण्या विषयी तसेच हॅंड ब्रेक सॉफ्टवेयर द्वारे विडियो कॉम्प्रेस करणे व इतर तांत्रिक बाबींविषयी माहिती दिली.

त्यानंतर कार्यशाळेचे मार्गदर्शक व सहभागी प्राध्यापक यांच्यात विविध समस्यांविषयी चर्चा होऊन समस्यांचे निराकरण करण्यात आले. सदर कार्यशाळेची प्रस्तावना समिती प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विनोद चौधरी यांनी मांडली.कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु.दिव्या जैन,रजिस्ट्रेशन व आभार प्रदर्शन डॉ.आर.एल.जवरास यांनी केले.

Protected Content