रावेर/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हार जीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रावेर पोलीसांनी केला आहे. या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली असून एकुण १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर शहरातील सुमन नगरातील दत्तू डिगांबर कोळी यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हार जीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करत असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रावेर गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे यांनी जुगाराच्या ठिकाणी जावून छापा टाकला.
यांना केली अटक
अभिषेक अनिल बानिक वय १९ रा. नागपूर, साहिल खान वकील खान वय २२ रा. पन्हाना जि.खंडवा, बलविर रघुविर सोलंकी वय २२ रा.जावल जि.खंडवा, अंकीत धमेंद्र चव्हाण वय १९ रा. खंडवा, साहिद खान जाहीर खान वय १९ रा.खडकवाडी जि.खंडवा आणि गणेश संतोष कोसल वय २५ रा. पन्हाना जि.खंडवा यांना अटक केली. हे सर्वजण www.wood777.com या बेबसाईटवरून व्हॉटसॲपद्वारे लिंक पाठवून लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळासाठी प्रोत्साहन देत होते. पोलीसांनी त्यांच्याकडून ९ मोबाईल, २ लॅपटॉप, असा एकुण १ लाख १५ हजार ७०० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.