जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँक खात्याचे केवायसी करण्याचा बहाणा करून सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह पत्नीच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर १९ हजार ३०० रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वासुदेव व्यंकटराव विभांडीक (वय-७९) रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव हे कोषागार विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते पत्नी सुमन यांच्यासह वास्तव्याला आहे. दोघांचे स्टेट बँक ऑफ इंडीयात बँक खाते आहेत. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात मोबाईल क्रमांकावरून रोहित शर्मा असे नाव सांगून ‘तूमचे बँक खात्याचे केवायसी बाकी असल्याने आधारकार्ड अपडेट करण्याची आवश्यकता आहे. असे सांगून त्यांच्याकडून माहिती व आलेल्या SMS वरील ओटीपी क्रमांक दिला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी सकाळी पुन्हा त्याच व्यक्तीने फोन करून खात्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असे सांगून तुम्ही जवळच्या एटीएम मध्ये जा असे सांगितले. विभांडिक यांच्या घराजवळ एटीएम नसल्याने ते बुधवार २७ एप्रिल रोजी दुपारी एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले. तिथे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या खात्यातून ४ हजार ४०० आणि त्यांची पत्नीच्या खात्यातून १४ हजार ९०० रूपये अज्ञात व्यक्तीने १९ एप्रिल रोजीच काढून घेतल्याचे लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विभांडीक यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २८ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.