जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत ६५ वर्षीय वृध्दाची ३३ लाख ३० हजार १०० रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश शंकरलाल मोर (वय-६५, रा. पाचोरा) यांना जेसिका नामक व्यक्तीने १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधून एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगितले. या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते खरेदी केल्यानंतर ॲपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्यामाध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यापैकी २ लाख ७० हजार रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश मोर यांनी मंगळवारी ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.