जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका तरूणीला ट्रेंडीग व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख ७ हजार ४५६ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात मोबाईल धारक महिलेवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका २० वर्षीय तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ मे २०२४ रोजी तरूणीला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर साक्षी सिंग असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधून त्यांच्या टेलीग्राम आयडीवर एक लिंक पाटविली. या लिंकद्वारे त्यांना एका टेलीग्राम गृपला जॉईन करण्यात आले. त्यात त्यांना एका नंबरवरून बँक खात्याची माहिती पूरवून शेअर मार्केट व ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाईन पध्दतीने २१ लाख ७ हजार ४५६ रूपये स्विकारले. त्यानंतर त्यांनी कोणताही परतावा दिला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणीने जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक एम.एम. कासार हे करीत आहे.