जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचा धाक दाखवत जळगावमधील निवृत्ती नगर येथील एका डॉक्टरला तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ इतक्या रकमेचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. या घटनेची नोंद सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील निवृत्ती नगरात ५८ वर्षीय डॉक्टर यांना ३१ डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत राधिका नावाच्या महिलेने आणि राजेश प्रधान व मुकेश बॅनर्जी या दोन व्यक्तींनी संपर्क केला. त्यांनी डॉक्टरांना त्यांनी एका मोबाईल क्रमांकावरून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप केला आणि त्यावरून बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.
गुन्ह्याशी संबंधित नोटीस व्हॉट्सॲपवर पाठवून, त्या मोबाईल क्रमांकाचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात वापर झाल्याचेही डॉक्टरांना सांगण्यात आले. या प्रकरणात, नरेश गोयल याला अटक झाली असून डॉक्टरांनाही अटक होऊ शकते, असे सांगत संबंधित तिघांनी डॉक्टरांकडून वेळोवेळी ३१ लाख ५६ हजार ६४ इतक्या रकमेचा ऑनलाईन हस्तांतरित करवून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासानंतर राधिका, राजेश प्रधान, आणि मुकेश बॅनर्जी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद कॉल्स किंवा संदेशांवर त्वरित विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.