जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दूध संघामध्ये दारूच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने दोन जणांनी कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) रोजी सायंकाळी ५ वाजता दूध संघ परिसरात घडली. या प्रकरणी रात्री ९.३० वाजता शहर पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय छगनलाल पाटील, मोहन रुपवते हे दूध संघात मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मद्याच्या बाटल्यासोबत घेऊन आल्याने त्या दोघांना आत जाण्यास योगेश भागवत निंबाळकर (वय ४१, रा. जळगाव) यांनी नकार दिला. त्यावेळी दोघांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालून निघून गेले. त्यानंतर वरील दोघे जण मद्यपान करून त्यांच्यासोबत तीन जण घेऊन आले. त्यांनी वाद घालत योगेश निंबाळकर यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी योगेश निंबाळकर यांनी रात्री ९.३० वाजता शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय पाटील, मोहन रुपवते, राजू पाटील व इतर दोन जण (नाव समजू शकले नाही) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फकिरा रंधे करीत आहेत.