दुमका (झारखंड), वृत्तसंस्था | नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलन सुरू असताना पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर मौन सौडले आहे. कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते, ते आता काँग्रेस करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचे काम केले आहे. त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय एकहजार टक्के योग्यच होता, हे सिद्ध झाले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व विधेयक लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने नागरिकत्व कायद्यावरून देशात विनाकारण वादळ निर्माण करून आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. आग लावणारे कोण आहेत? हे त्यांच्या कपड्यांवरूनच माहीत पडते. आता यांच्याकडून देशाच्या हिताची कोणतीही आशा राहिलेली नाही. हे लोक केवळ त्यांच्या कुटुंबाचाच विचार करण्यात गुंग झालेले आहेत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जाळपोळ करणाऱ्यांचे मूक समर्थन करत आहेत. हिंसेकडे कानाडोळा करत आहेत, देश हे सगळे पाहत आहे. त्यामुळे संसदेने नागरिकत्व कायदा बनवून देशाला वाचवल्याचा लोकांचा पक्का समज झाला आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आम्ही हा कायदा केला आहे. अल्पसंख्याकांनी या तिन्ही देशात प्रचंड हाल सहन केले आहेत. तिकडे त्यांचे जगणेही कठिण झाले आहे. या देशांमधील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्धांना शरणार्थी म्हणून तिथे राहावे लागत आहे, अशा लोकांना आम्ही नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.