नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरसूल येथे हवेत गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका हॉटेलमध्ये लवकर जेवण न मिळाल्याच्या रागातून एकाने गावठी पिस्तूलातून सात राऊंड फायर केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी नाशिकमधून चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत इनोव्हा कार, एक पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, हरसूल येथील हॉटेल कश्यपी फोर्टमध्ये इम्रान अयनूर शेख, शेखर दिलीपराव कथले, अरबाज शब्बीर खान पठाण व राहुल श्याम क्षत्रिय हे चौघेही मद्य पिऊन जेवण करण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये त्यांनी ऑर्डर देऊन जेवण केले. त्यानंतर काहीतरी ऑर्डर दिल्यावर ती ऑर्डर लवकर का आणली नाही, यातून वाद घालत त्यातील एकाने त्यांच्याजवळील गावठी पिस्तूलातून हॉटेलचा मॅनेजर आणि वेटरच्या समोर सात राऊंड हवेत फायर केले.
त्यानंतर धाकाने चौघे इनोव्हा कारमध्ये बसून नाशिकच्या दिशेने पळाले. ही माहिती हरसूल पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी गुन्ह्याचा तपास करताना गंगापूर पोलिसांना संशयित नाशिकमार्गे येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार गंगापूर पोलीसांनी नाकाबंदीसह संशयितांना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एमएच 20 सीए 9595 ही संशयास्पद इनोव्हा गिरणारे येथून गंगापूर रोडकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने गंगापूर जकात नाक्याजवळ इनोव्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयित चालकाने कार न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी डीबी मोबाइल कारने पाठलाग करून इनोव्हा गंगापूर गाव जकात नाक्याजवळ अडविली. तेव्हा चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले.