जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील उज्वल चौकात एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून पाठलाग करून तिचा मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढत हा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी रविवारी, १० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात विपुल मोहन शंकपाळ (वय २८, रा. वाल्मिक नगर, जळगाव) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी बुधवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास क्लासला जात होती. याचवेळी संशयित आरोपी विपुल शंकपाळ याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. जळगावातील उज्वल चौकात त्याने मुलीचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने तातडीने आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली.

नातेवाईकांनी या घटनेची गंभीर दखल घेत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रविवारी रात्री ११ वाजता संशयित आरोपी विपुल मोहन शंकपाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत.



