चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोर वाहन उभे करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना चोपडा शहरातील रामपुरा पारधी वाडा परिसरात गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव भिका पारधी (वय ४९, रा. रामपुरा पारधीवाडा) हे व्यावसायाने ड्रायव्हर आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास, संशयित आरोपी जगदीश राजेंद्र पारधी याने नामदेव पारधी यांच्या घरासमोर आपली गाडी लावली होती. नामदेव पारधी यांनी आरोपींना “तुमची गाडी आमच्या घरासमोर न लावता बाजूला लावा,” अशी विनंती केली. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. संशयित आरोपी जगदीश राजेंद्र पारधी, राजेंद्र गबा पारधी आणि निखिल राजेंद्र पारधी या तिघांनी संगनमत करून नामदेव पारधी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जगदीश पारधी याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोळ्यावर आणि कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली. “आज वाचलास, पण यापुढे नादी लागलास तर तलवारीने कापून टाकू,” अशी जीवे मारण्याची धमकीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.




