रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धामोडी फाटयाजवळ आज सायंकाळी चिंचेच्या झाडावर वीज पडली. या दुर्घटनेत झाडाच्या बाजूने जात असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
या संदर्भात अधिक असे की, खिर्डी येथील रहिवासी असलेले डीगंबर पाटील (वय ५५) नेहमी प्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ऐनूपुर रस्त्याने अजंदे फाटयापर्यंत फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक वातावरमध्ये बदल झाला. त्यानंतर वीजेचा कडकडाक होण्यास सुरुवात होत अचानक चिंचेच्या झाडावर वीज पडली. श्री. पाटील हे झाडाच्या बाजूने जात होते. त्यामुळे या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उषारानी देवगुने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.