नागपूर वृत्तसंस्था | ‘नावात काय आहे ?’ असं शेक्सपिअरनं म्हटलंय. हे वाक्य दोन्ही प्रकारे वापरलं जातं. याचप्रमाणे ‘जग जिंकण्याची’ त्या सिकंदरची मनीषा होती तर ‘अमली पदार्थासाठी काहीही’ अशी मनीषा असेलल्या सिकंदरला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
आपण रेल्वेत प्रवास करत असतांना तेथील स्वच्छतागृहात गेल्यावर नळाची तोटी निघून पाणी वाहत वाया जात असल्याचं आपल्या निदर्शनास आल्यावर आपण सर्रास रेल्वे प्रशासनासह शिव्यांची लाखोली वाहतो मात्र बऱ्याच यासाठी आपल्यातलेच काही सिकंदर जबाबदार असल्याचं समोर आलं असून रेल्वे स्वच्छतागृहातून नळाच्या तोट्या चोरणाऱ्या आरोपीला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल ५५ पेक्षा जास्त नळ जप्त करण्यात आले आहेत.
‘अंमली पदार्थांची सवय लागल्याने त्यासाठी काहीही’ हे तत्व बाळगत सिकंदर जहीर खान रेल्वे स्वच्छतागृहातील नळ तोट्या चोरायचा आणि त्या विकून मिळणाऱ्या पैशातून अमली भागवायचा. असे सिकंदर याला अटक केल्यानंतर त्याने नागपूर रेल्वे पोलीसांना सांगितले.
वारंवार होणारी नळांची चोरी आरपीएफसाठी आव्हानात्मक होती काही दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील अनेक बोगीतील नळ चोरीला जात असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुद्धा बुचकळ्यात पडले होते. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सिकंदर खान रेल्वे गाड्यांच्या अनेक स्वच्छतागृहात वारंवार जात असल्याचे निदर्शनास येताच आरपीएफ जवानांनी त्याला थांबवत विचारपूस केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याने जवानांनी त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ अनेक नळ आढळून आले. सिकंदरकडून ५५ नळ जप्त करण्यात आले असून त्याने आजपर्यंत दोनशेपेक्षा अधिक नळ चोरल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यास अटक केली असून या घटनेची माहिती सामान्य नागरिकांना कळल्यावर ‘एक तो सिकंदर, एक हा सिकंदर’…. आणि हा गेला जेलके अंदर…’ असा सूर निघत होता.