जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेलेला साप अंगणात टाकल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून दाम्पत्याला केलेल्या मारहाणीत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बोदवड तालुक्यातील मनुर गावात घडली. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास सिताराम पाटील वय ४० रा. मनूर ता.बोदवड असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील मनूर गावात विलास पाटील हे आपल्या पत्नी विद्या आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. ते बोदवड तहसील कार्यालयात शिपाई या पदावर नोकरी करत होते. गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता शेजारी राहणारे नाना बाबूराव पाटील त्यांच्या घरात मारलेला साप हा विलास पाटील यांच्या अंगणात टाकलेला होता. त्यामुळे विलास यांची पत्नी विद्या यांनी हा मारलेला साप अंगणात टाकू नका असे सांगितले. या रागातून नाना बाबूराव पाटील, विलास बाबूराव पाटील, महेंद्र नाना पाटील, पवन नानाा पाटील, अक्षय विजय पाटील, भास्करबाई बाबूराव पाटील, सुनंदाबाई नाना पाटील, माया विजय पाटील, निकीता विजय पाटील यांनी सर्वांनी विद्या पाटील यांच्यासह त्यांचे पती विलास पाटील यांना त्यांचा घरात घुसून बेदम मारहाण केली.
या मारहाणीत विलास पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रविवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत मयत विलास पाटील यांनी मृत्यूपुर्वी नशिराबाद पोलीसांना मारहाण केल्याचा जबाब दिला आहे. अशी माहिती त्यांची पत्नी विद्या पाटील यांनी दिली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात एकच अक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी विद्या, मुलगा ओम आणि मुलगी दिप्ती असा परिवार आहे.