Home क्राईम गावठी पिस्तूलासह एकाला अटक; भुसावळ बाजारपेठ पोलीसांची कारवाई

गावठी पिस्तूलासह एकाला अटक; भुसावळ बाजारपेठ पोलीसांची कारवाई


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर आणि परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असून, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने श्रीराम नगर भागात सापळा रचून एका आरोपीला गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक गस्तीवर होते. दरम्यान, श्रीराम नगर भागातील श्रीराम मंदिराजवळ एक संशयित तरुण गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुल घेऊन थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.

आरोपीकडून मुद्देमाल जप्त :
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने श्रीराम नगर परिसरात धाड टाकली. यावेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या संदीप सुनील जाधव (वय २३, रा. कुमावत नगर, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी पिस्तुल (मॅग्झिनसह) आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाची कामगिरी :
ही यशस्वी कारवाई सहाय्यक फौजदार राजू सांगळे, भारती काळे, विजय नेरकर, कांतीलाल केदारे, भूषण चौधरी, अमर अढाळे, योगेश माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय नेरकर करत आहेत. शहरात शांतता राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


Protected Content

Play sound