जळगाव प्रतिनिधी । घरगुती वाद असल्याने मध्यप्रदेशातून जळगाव येत आपल्या चुलत भावाची दुचाकी जाळल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयित आरोपीची ओळख पटविली असून त्याला लग्नासोहळ्याच्या ठिकाणाहून रोहित रामकिसन पवार (२०) रा. बेलवाडी ता. हरसूद, जि. खंडवा याला अटक करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील छनेरा तालुक्यातील बेलवाडी येथील राहुल गबरु पवार (२४) हा तरुण सावखेडा शिवारातील गणपती नगरात पत्नीसह भावासोबत वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे एमपी १२ एमव्ही ९२४२ व एमपी १२ एमएक्स ५३४९ क्रमांकाच्या दोन दुचाकी होत्या. ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडवाजेच्या सुमारास अज्ञाताने त्यांची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपी निष्पन्न
दुचाकी जाळल्याची घटना घडताच पोलिसांनी त्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यात १.४० वाजेच्या सुमारास गाड्या जळत असतांना १.५१ वाजता एकजण त्याठिकाणाहून जात असल्याचे फुटेजमध्ये कैद झाले होते. पोलीसांनी त्याचा चेहरा स्पष्ट करुन राहुल पवार यास दाखविला असता तो संशयित राहुलचा चुलत भाऊ रोहित रामकिसन पवार हा असल्याचे त्याने ओळखले.
पथक तयार करुन मध्यप्रदेशात रवाना
संशयित आरोपीची ओळख पटताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी हेकॉ अल्ताफ पठाण, पोना प्रवीण जगदाळे, होमगार्ड सर्फराज तडवी यांचे पथक तयार करुन ते मध्यप्रदेशात रवाना केले.
लग्नसोहळ्यातूनच केली अटक
संशयित आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरुन त्याचा पत्ता शोधण्यात आला. त्यानंतर पथक मध्यप्रदेशात त्याची विचारपुस केली असता, रोहित हा कामानिमित्त बाहेरगावी होता. परंतु गावातच त्याच्या मामाचे लग्न असल्याने तो लग्नाला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लग्नसोहळ्याठिकाणी पोहचत प्रवेशद्वारावरच पहारा दिला. रोहित हा लग्नाला येताच त्याला प्रवेशद्वारावरच अटक करीत रामानंद पोलीस ठाण्यात आणले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.