यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिका निवडणूक २०२५ च्या छाननी प्रक्रियेत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. एकूण १३० उमेदवारी अर्जांच्या तपासणीत २८ अर्ज अवैध ठरवण्यात आले असून १०२ अर्ज वैध आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या एकूण ७ पैकी एक अर्ज अवैध ठरला असून आता ६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. छाननीदरम्यान दाखल झालेल्या चार हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावत संबंधित उमेदवारांचे अर्ज वैध घोषित केले.

निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या समोर चार हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकती छाया अतुल पाटील (नगराध्यक्ष पद), त्यांचे पती अतुल वसंतराव पाटील (वार्ड ११), माजी नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी, तसेच ज्योती नितीन सोनार यांच्या विरोधात होत्या. छाया पाटील व त्यांच्या पतींच्या नावावर कौटुंबिक मालमत्ता कर थकलेला असल्याच्या तक्रारीवरून हरकत दाखल करण्यात आली होती. तसेच माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना पूर्वीच्या कार्यकाळात जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अपात्र करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व चार हरकती फेटाळून उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले. या निर्णयानंतर नगरपालिकेसमोर उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आणि घोषणा देत आनंद व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदासाठी अफरीन अंजूम शेख अलीम यांचा अर्ज अधिकृत एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी एकूण ६ अर्ज वैध आहेत. नगरसेवक पदांसाठी १०२ अर्ज वैध राहिले असून अंतिम चित्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, निवडणूक निरीक्षक सुभाष बोरकर यांनी सायंकाळी उशिरा यावल नगरपालिका कार्यालयाला भेट देत संपूर्ण छाननी प्रक्रियेचा आढावा घेतला.



