भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी गावी येथील तरुणाचे लग्न लावून आलेल्या नवरी लग्नाचे ५० हजारांचे दागिने घेवून पसार झाल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात नवरीसह जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिंदी येथील २८ वर्षीय तरूण हा विवाह योग्य झाला होता. मुलगी मिळत नसल्याचे विवंचनेत असतांना सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार दो. रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक, अशोक वीरसिंग खाडे रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार आणि गुड्डीबाई समाधान शिंपी रा. गाळण ता. पाचोरा यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च करावे लागतील. त्यानुसार तरूणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला आणि ३० ऑगस्ट रोजी अक्षरा मनोज रंधे रा. नशिराबाद ता. जि.जळगाव या तरूणीशी लग्न लावून दिले. दरम्यान, तरूणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर ही भुसावळ येथे जावून येते असे सांगून सोबत दागिने घेवून भूसावळ येथून पसार झाली. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवरीसह सहा जणांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.