Home Cities जळगाव अयोध्येतील राम लल्ला प्राणप्रतिष्ठेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त चिमुकले राम मंदिरात महाआरती

अयोध्येतील राम लल्ला प्राणप्रतिष्ठेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त चिमुकले राम मंदिरात महाआरती


जळगाव -–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या ऐतिहासिक घटनेला २ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, जळगाव शहरात गुरुवारी सायंकाळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील प्रसिद्ध ‘चिमुकले राम मंदिर’ येथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते महाआरती
अयोध्येत राम लल्ला विराजमान व्हावेत, ही हिंदू भाविकांची ५०० वर्षांपासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाली. या मंगल दिनाचे स्मरण म्हणून आमदार राजूमामा भोळे यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामाची महाआरती केली. यावेळी मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

पंतप्रधान मोदींमुळे स्वप्नपूर्ती: आ. भोळे
याप्रसंगी आमदार भोळे म्हणाले की, “राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही प्रत्येक हिंदू बांधवासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच कोट्यवधी हिंदूंचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.” यावेळी त्यांनी सर्व सनातन धर्मियांना या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लाडू प्रसाद वाटप
या सोहळ्यात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित भाविकांना आणि नागरिकांना प्रसाद म्हणून लाडूंचे वाटप करण्यात आले. २ वर्षांनंतरही राम भक्तांमधील उत्साह तसूभरही कमी झालेला नसल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.


Protected Content

Play sound