जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगर, रामानंद नगरजवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे अखंड नामजप यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तिभावात सुरुवात झाली असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमात दररोज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे २५ ते ३० सेवेकरी सामूहिकरित्या श्री गुरुचरित्र पारायणासाठी बसले असून श्रद्धेने वाचन करत आहेत. सकाळी औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा करून दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर सकाळी आठ वाजता भूपाळी आरती पार पडते, तर साडेदहा वाजता मुख्य आरतीनंतर विशेष याग, नैवेद्य आणि पूजाविधी संपन्न होत आहेत.

आजच्या दिवशी विशेष चंडी याग यज्ञ सेवा पार पडली. या यज्ञाद्वारे जनकल्याण, देशावरील संकटांचे निवारण आणि सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. शास्त्रीनगर सेवा केंद्रातील सर्व सेवेकरी अत्यंत निष्ठेने आणि नियमितपणे या धार्मिक सेवेत सहभागी होत आहेत.
या सप्ताहादरम्यान भक्तांना आध्यात्मिक समाधान मिळत असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक प्रार्थनेचा हा संगम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे.
या धार्मिक उपक्रमातून समाजात अध्यात्मिक जागरूकता वाढवण्याचा आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थनेचा संदेश दिला जात असून नागरिकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.



