मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी येत्या रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबईत महाविकास आघाडी सरकारकडून ‘जोडे मारो आंदोलन’ करणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे यांनी ही घोषणा केली.
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते रविवारी सकाळी ११ वाजता हुतात्मा चौकात जमतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना वंदन केल्यानंतर गेट ऑफ इंडियाच्या दिशेने मोर्चा काढला जाईल. गेट ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलं जाईल. त्या वेळी या सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असे ठाकरे यांनी जाहीर केलं. या आंदोलनाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.