जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होऊन झालेल्या ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’ या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. न्युरोलॉजी, मेडिसिन व क्रिटिकल केअर तज्ज्ञांच्या समन्वयामुळे आणि वेळेवर करण्यात आलेल्या निदानामुळे या रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

नशिराबाद येथील रजनी जावळे (वय ६२) या महिलेला काही दिवसांपासून सतत मळमळ, उलट्या, बडबड आणि भान हरपणे अशा तक्रारी जाणवत होत्या. रुग्णालयात दाखल होताच प्राथमिक तपासणीत तिच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत वाढलेले आढळले. काही वेळातच तिला झटका आला आणि शरीराच्या एका बाजूवरील हालचालीवर नियंत्रण राहिले नाही. तातडीने तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.

न्युरोलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉ. हितेश मोरे यांनी तातडीने एमआरआयद्वारे तपासणी केली असता मेंदूतील काही भागांना योग्य रक्तपुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’ म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे रुग्णाची चेतना, स्मरणशक्ती आणि हालचाल नियंत्रणे बिघडतात. हा आजार रक्तातील साखर, इलेक्ट्रोलाईट्स, तसेच यकृत किंवा मूत्रपिंडाच्या कार्यातील बिघाडामुळे होऊ शकतो.
रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. अनुभवी न्युरोलॉजीस्ट आणि मेडिसिन तज्ज्ञांच्या टीमने सातत्यपूर्ण देखरेख ठेवत औषधोपचार केले. मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाची शुद्धी परत आली आणि हात-पायांची हालचाल सुधारू लागली. सध्या रुग्ण पूर्ण शुद्धीवर असून ती स्वबळावर चालू आणि बोलू शकते.
या यशस्वी उपचारात वरिष्ठ मेडीसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रया कांते, डॉ. पूजा तन्नीरवार, डॉ. तेजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हितेश मोरे, डॉ. आशिक शेख, डॉ. हर्ष पटेल, डॉ. ललितकुमार, डॉ. रिषभ पाटील, डॉ. राजसुरज लोखंडे, डॉ. ऋषीकेश वझे, डॉ. तन्मय मेहता, डॉ. सई पाटील तसेच नर्सिंग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



