
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थीदशेतच विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातून अमळनेर येथील एका होतकरू विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बोहरा सेंट्रल स्कूलमधील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या ओम अनिल पाटील याची इस्रो सहलीसाठी निवड झाल्याने अमळनेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नोबेल फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड परीक्षेतून ओम अनिल पाटील याची अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) केंद्राला भेट देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. या परीक्षेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता; मात्र ओमने आपल्या बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि विज्ञानातील आवडीच्या जोरावर हे यश संपादन केले.
जळगाव येथील कांताबाई सभागृहात पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात सुप्रसिद्ध लेखक व शिक्षणतज्ञ राजीव तांबे यांच्या हस्ते ओम पाटील याचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्याच्या यशाचे कौतुक करत भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात येत आहे. ओम पाटील हा सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक तसेच दैनिक साईमतचे तालुका प्रतिनिधी अनिल नथ्थू पाटील आणि गायत्री पाटील यांचा सुपुत्र असून, कुटुंबातील शैक्षणिक वातावरणाचाही त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे.
ओमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच अमळनेर परिसरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याची निवड इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



