जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या सातपुडा ऑटोमोबाइल्स या शोरूमच्या मागील बाजूस जुन्या वाहनांनाअचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत अद्याप पोलीसांत नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात चारचाकी वाहनांचे सातपुडा ऑटोमोबाईल शोरूम आहे. शोरूमच्या मागील बाजू परिसरात जुने भंगार वाहने असतात. या वाहनांमधील एका वाहनाला बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. शोरूममधील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शोरूममधील फायर एक्स्टिग्युशरचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले अग्निशमन विभागाचे कर्मचारी- रोहिदास चौधरी, भगवान पाटील, संतोष तायडे, ईश्वर पाटील,तेजस जोशी,नितीन बारी यांनी नियंत्रण मिळवत आग विझवली. आगीत दोन जुन्या वाहनांचे नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशमन बंब पोहोचल्याने नुकसान टळले. नाहीतर या ठिकाणच्या इतरही जुन्या वाहनांना आग लागून ती वाहने खाक झाली असती. जुन्या वाहनातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.