ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात वृध्द ठार, तीन जण जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मलकापूर येथून धरणगावला जाण्यासाठी निघालेल्या रिक्षाला दीपनगर उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील ६२ वर्षीय वृद्ध हे ठार झाले तर रिक्षा चालकासह पतीपत्नी हे जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. याबाब ट्रकवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश बुद्ध सारसर वय-६२, रा. उमाळी ता. मलकापूर जि. बुलढाणा असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

अधिक असे की, लखन गोविंदा पटोने वय-३५, रा. रामदेव बाबानगर धरणगाव हे आपल्या पत्नी अंजली लखन पटोने यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. लखन यांची पत्नी अंजली या माहेरी उमाळी ता. मलकापूर येथे गेलेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी लखन पटोने देखील गेले होते. तेथून परत धरणगाव येथे येण्यासाठी लखन पटोने पत्नी अंजली आणि सासरे रमेश बुध्द सारसर यांच्यासोबत रिक्षा क्रमांक (MH 19 CF 0566)ने निघाले. दीपनगरकडून भुसावळकडे येत असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक (MH 19 CY 4833) ने त्यांच्या रिक्षाला जोरदार दळण दिली. या अपघातात रमेश सारसर यांचा मृत्यू झाला तर लखन पटोने व त्यांची पत्नी अंजली पटोने हे दोघे जखमी झाले. दरम्यान, या घटनेबाबत लखन पटोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

Protected Content